नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सोमवारी पुन्हा लिटरमागे प्रत्येकी 60 पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी ती दोन्ही इंधने महागली आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज बदल करण्याच्या प्रक्रियेत 82 दिवस खंड पडला होता. ती प्रक्रिया सार्वजनिक इंधन कंपन्यांनी रविवारपासून पुन्हा सुरू केली. पहिल्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर 60 पैशांनी वाढवण्यात आले. सोमवारी त्याची पुनरावृत्ती झाली.
त्यामुळे दिल्लीत लिटरमागे पेट्रोलचा दर 72 रुपये 46 पैसे आणि डिझेलचा दर 70 रुपये 59 पैसे इतका झाला आहे. केंद्र सरकारने 14 मार्चला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली.
मात्र, त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. त्यामुळे सार्वजनिक कंपन्यांनी उत्पादन शुल्क वाढीचा भार ग्राहकांवर टाकला नाही. त्याशिवाय, नंतर लागू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत मोठी घट झाली. त्यातून इंधन दरांमधील दैनंदिन बदल काही दिवस स्थगित ठेवण्यात आला.
घरगुती वापराच्या गॅसच्या (एलपीजी) दरातील बदल नेहमीप्रमाणेच दर महिन्याच्या प्रारंभापासून लागू होईल.