वाघोली, दि. 8 (प्रतिनिधी) -पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात काही दिवसांत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासन व इतर सर्व समन्वयीन यंत्रणा चांगले काम करीत आहेत. नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे, नियमांचे पालन करून करोनावर संकटावर निश्चितपणे मात करू. आगामी काळात वाघोली परिसर लवकरच करोनामुक्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.
वाघोली (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीत जिल्हाधिकारी राम यांनी प्रशासकीय यंत्रणा, ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सरपंच वसुंधरा उबाळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम यांनी वाघोली परिसरातील आढावा घेतला. आयुष प्रसाद यांनी वाघोलीत करोना संसर्गाबाबत प्रतिबंधाकरिता समाजमाध्यमांद्वारे जनजागृती केली जाणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी यांनी भारतीय संस्कृती दर्शनच्या आयुर्वेदिक हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली. संस्थात्मक विलगीकरण कक्ष, प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.