इस्लामाबाद – पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयात प्रथमच एका महिलेची न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. आयेशा मलिक असे या न्यायाधीश महिलेचे नाव आहे. त्या सध्या लाहोर उच्च न्यायालयातील न्यायाधीश आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याबाबत निर्णय झाला आहे.
पाकिस्तानातील सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्या अध्यक्षतेखालील न्यायिक आयोगाने 5 विरुद्ध 4 अशा मतांच्या फरकाने मलिक यांच्या सर्वोच्च न्यायालयातील बढतीला मान्यता दिली आहे.
न्यायिक आयोगाच्या शिफारसीनंतर मलिक यांच्या नावाचा संसदीय समितीकडून विचार करण्यात येईल. न्यायिक आयोगाच्या शिपारसींना संसदीय समितीकडून मान्यता मिळणे ही केवळ एक औपचारिकता असते.
न्या. मलिक यांच्या बढतीबाबत न्यायिक आयोगाकडून दुसऱ्यांदा विचार झाला आहे. यापूर्वी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्येही त्यांच्या नावाचा विचार झाला होता. मात्र त्यावेळी आयोगामध्ये मतांची विभागणी समसमान झाली होती.