नवीन वर्षात पारा घसरला : पावसाळा, हिवाळ्याचा अनुभव
पिंपरी – यावर्षीचा हिवाळा हा कमी थंडीचा वाटत असतानाच मागील दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. सकाळी धुके आणि थंड वारा वाहू लागला असून दुपारी ढगाळ वातावरण जाणवू लागते. त्यामुळे, सध्या बदलत असलेल्या वातावरणाचा पिंपरी-चिंचवडकरांना अनुभव येत आहे.
मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 31 डिसेंबर रोजी किमान तापमान 14 अंश सेल्सियस होते. तर एक जानेवारीला यामध्ये घट होऊन किमान तापमान 11 अंशावर आले होते. त्यामुळे, नवीन वर्षात नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव मिळाला होता. बुधवारी आणि गुरुवारीही तापमान कमी असल्यामुळे थंडीच्या या वातावरणात सकाळी उठून व्यायामाला बाहेर पडणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.
शहरातील प्रमुख मार्गावर तसेच बाग व मैदानात ज्येष्ठ नागरिकांसह तरुण-तरुणी फिरायला येत आहे. तापमानात घट झाल्यामुुळे मागील दोन दिवसांपासून बाहेर पडताना स्वेटर, मफलर आदी गरम कपडे घालणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बुधवारी सायंकाळपासूनच वातावरणात बदल झाला असून शहर व परिसरात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे.
ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झालेला पहायला मिळत होता. आता सातत्याने होणाऱ्या हवामान बदलामुळे रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सध्या किमान तापमानाचा पारा 11 ते 12 अंशावर असून पुढील काही दिवसांत तापमान 10 अंशापेक्षाही खाली जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.