लोणावळा – पिंपरी-चिंचवडच्या पुढे लोणावळा-खंडाळा-खारघरपर्यंत आपला मतदारसंघ आहे, याची जाणीव आपल्या खासदारांना केव्हा होणार? बोला ‘खासदारसाहेब’ बोला.. काहीतरी बोला…!!! असा संतप्त सवाल उपस्थित करीत जोवर मावळातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर तोडगा काढणार नाही, तोवर आम्ही मतदान करणार नाही, असा इशारा मावळातील रेल्वे प्रवाशांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना दिला आहे. याशिवाय ‘आमचे मावळचे खासदार करतात काय..!!’ असा सवाल उपस्थित करणारे फलक या रेल्वे प्रवाशांकडून लोणावळा शहरात जागोजागी लावण्यात आले आहे.
पुणे-लोणावळा- पुणे लोकलच्या फेर्या दुपारी तीननंतरही सुरू ठेवाव्यात. चाकरमान्यांसह सामान्य प्रवाशांना एक्स्प्रेसमधून प्रवासाची अनुमती द्यावी. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना तळेगाव दाभाडे येथे थांबा द्यावा.
करोना प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून बंद असलेल्या पुणे-लोणावळा लोकल चालु का होत नाहीत. विद्यार्थी, पेशंट, कामगारवर्गाचे हाल यांना दिसत नाहीत का? रेल्वे प्रवाशांची संख्या वाढून सुध्दा गेल्या दहा वर्षात एक सुध्दा नविन पुणे-लोणावळा लोकल का चालु झाली नाही? कोविड अगोदर मुंबईतून सुटणार्या सह्याद्री एक्सप्रेस, कन्याकुमारी एक्सप्रेस या रेल्वे गाड्या मुंबईतून का सुटत नाहीत? ’डेक्कनची राणी’ व ’डेक्कन एक्सप्रेस’ च्या कोव्हीडमध्ये काढलेल्या ’ लोणावळा बोगी’ पुन्हा का लावल्या जात नाहीत? मावळवासीयांसाठी सोयीची असणारी ’पुणे-भुसावळ’ एक्सप्रेस एका महिला खासदाराने अमरावतीला पळवून नेली, तेव्हा आपले खासदार काय करत होते सर्व एक्सप्रेस गाड्या लोणावळा-कर्जत रेल्वे स्टेशनवर का थांबविल्या जात नाहीत, अजून किती रेल्वे प्रवाशांचे बळी जायची वाट पहात आहेत? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, लोणावळा रेल्वे स्टेशनवर पुण्याच्या बाजुला नविन पादचारी पुलाची आवश्यकता आहे, तो केव्हा होणार मुंबई-नाशिक-मनमाडच्या सर्व रेल्वे गाड्या 21-23 बोर्गीच्या होऊ शकतात, तर मुंबई-पुणे चालणार्या रेल्वेगाड्या 21-23 बोगींच्या का होऊ शकत नाही? आशा प्रश्नांची सरबत्ती शहरात जागोजागी लावण्यात आलेल्या फलकांच्या माध्यमातून खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर करण्यात आली आहे.
प्रवाशांची न्यायालयात धाव
अशा विविध मागण्यांसाठी गेली दहा वर्षे रेल्वे मंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी व मध्य रेल्वे प्रशासनाकडे दाद मागूनही अपयश आल्याने अखेर संतप्त प्रवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील धाव घेतली आहे. पुणे – मुंबई – पुणे नियमित प्रवास करणार्या प्रवाशांच्या न्याय हक्कांसाठी लढणार्या पुणे प्रवासी संघाचे प्रतिनिधी शेखर डेरे व इतर 50 प्रवाशांनी ही याचिका दाखल केली आहे. मात्र हे करीत असतानाच या प्रवाशांनी खासदार बारणे यांच्या विरोधात देखील आपला मोर्चा खोलला असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.