पुणे – खेळण्याच्या बहाण्याने दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला टेरेसवर नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या 18 वर्षीय तरुणाला पाच वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर. यु. मालवणकर यांनी हा आदेश दिला आहे. दंड भरल्यास ती रक्कम पीडितेल नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची फिर्याद देण्यात आल्यानंतर तिला होस्टेलला राहावे लागले. तिला आपल्या कुटूंबापासून दूर राहावे लागले. या प्रकरणातील आरोपीने त्याच्यावर कुटूंबाची जबाबदारी असल्यामुळे कमी शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. मात्र, अशा प्रकारच्या गुन्ह्यात आरोपीला शासन होऊन योग्य संदेश समाजात जाणे आवश्यक आहे, असे निकालात नमुदत करत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
सोन्या उर्फ भरत हरिश्चंद्र घोलप असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत दहा वर्षीय पीडीत मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली होती. या खटल्याचे कामकाज सहायक जिल्हा सरकारी वकील सुनिल हांडे यांनी पाहिले. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक शैलजा जानकर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. पोलीस हवालदार आर. एन. यांणी न्यायालयीन कामकाजात मदत केली. आरोपी पीडीत मुलीच्या घरासमोर राहत होता. पीडीत मुलगी पाचवीत शिकत होती.
आरोपीने सायंकाळच्या वेळी तिला लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने टेरेसवर नेऊन बलात्कार केला होता. एके दिवशी झोपेत पीडीत मुलगी ओरडत असताना पाहून तिच्याकडे आईने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. सुनिल हांडे यांनी केली.