नवी दिल्ली – केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून यशवर्धन कुमार सिन्हा यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असल्याची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना अधिकार पदाची शपथ दिली.
बिमल जुल्का यांची मुदत संपल्यानंतर ते 26 ऑगस्ट रोजी निवृत्त झाले होते. त्यानंतर गेली दोन महिने हे पद रिक्त होते. सिन्हा हे निवृत्त ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत श्रीलंका आणि ब्रिटन येथे भारतीय उच्चायुक्त म्हणून काम केले आहे.
62 वर्षीय सिन्हा यांना या पदावर तीन वर्षांचा कालावधी मिळणार आहे. साधारणपणे माहिती आयुक्तांना पाच वर्षाचा कालावधी मिळतो पण त्यांच्या वयाची मर्यादा 65 अशी निश्चित करण्यात आली असल्याने सिन्हा यांना तीन वर्षांचाच कालावधी मिळणार आहे.
अन्य तीन जणांची माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती झाली असून त्यांना सिन्हा यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे. पत्रकार उदय माहुरकर, माजी कामगार सचिव हिरालाल सामरिया आणि माजी महालेखापाल सरोज पुनहानी यांची माहिती आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे.