सिवनी – मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. तथापि हा वाघ दुसऱ्या एका मोठ्या वाघाने केलेल्या हल्ल्यात मरण पावला असावा अशी शंका वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या वाघाच्या मृत्यू मागे शिकारीचा प्रकार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात पंधरवड्यातील वाघाचा हा पाचवा मृत्यू आहे. पेंच मध्ये मृतावस्थेत आढळलेला हा वाघ दोन वर्ष वयाचा होता. मृत वाघाचे पुढचे पाय आणि दात शाबूत होते, तर शेपूट आणि मागचे पाय आणि नखे जवळच आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. श्वान पथकाच्या मदतीने कसून तपास करण्यात आला आणि घटनास्थळी कोणत्याही संशयास्पद हालचालीचा पुरावा मिळाला नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.