श्रीनगर – पुलवामा आणि बडगाम जिल्ह्यातील झालेल्या दोन चकमकीत जैश- ए- महंमदच्या स्वयंघोषित कमांडरसह पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या पाच जणांपैकी चार जण जैशसी संबधित आहेत.
सुमारे 12 तास सुरू असणाऱ्या चकमकीत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचे पाच दहशतवादी मारले गेले आहेत, असे ट्विट पोलिसांनी केले आहे. पुलवामामधील नैरा गावात शनिावारी सायंकाळी सुरू असणाऱ्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले. या गावात दहशतवादी लपल्याची पक्की खबर मिळाल्यानंतर पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलाने नाकाबंदी करून कारवाई सुरू केली.
पोलिसांनी केलेली कोंडी फोडण्यासाठी दहशतवाद्यांनी अंधाधूंद गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी तोडीस तोड उत्तर दिले. हा गोळीबार अनेक तास सुरू होता. यात ठार झालेला जैशचा कमांडर झहीद वणी यांची ओळख पोलिसांनी पटवली आहे. हा पाकिस्तानी नागरिक असून त्याचा मृत्यू हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानण्यात येत आहे.
छरार ए शरीफ या गावात पोलिसांशी झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाचा एक दहशतवादी मारला गेला. त्याच्याकडून एका एके 56 रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तेथे शोध मोहीम अद्याप सुरू आहे. शनिवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी एका पोलिसाची त्याच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या केली.