नगर (प्रतिनिधी) – नगर-शिर्डी महामार्गाच्या कॉंक्रिटीकरण व मजबुतीकरणाच्या कामासाठी पाचशे कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामासाठी तत्वत: मंजुरी मिळाली असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावास हिरवा कंदील दिल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
नगर-मनमाड महामार्गाची दुरवस्था वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. त्यात शिर्डीला येणाऱ्या भाविकांनाही प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतो. शिंगणापूरकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर होतो. त्यातून रोजच्या वाहतूक व्यवस्थेचाही खोळंबा होतो. त्या पार्श्वभूमीवर रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी खासदार विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची मागणी केली होती.
या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. खा. विखे पाटील यांनी त्यासंदर्भात केंद्रीय रस्ते महामार्ग व वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. काल दिल्लीत त्यासंदर्भात विखे पाटील यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रस्तावाबाबत चर्चा केली.
31 मार्चअखेर काढणार निविदा..!
पुढील महिन्यात नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियामार्फत नगर-शिर्डी रस्त्याच्या कामासाठी निविदा प्रकाशित केली जाणार आहे. तसेच येत्या 31 मार्चअखेर या कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल. तशा सूचना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित विभागाला दिल्या असल्याची माहिती डॉ. विखे पाटील यांनी दिली.