पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील संशयित नागरिकांची तातडीने तपासणी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1 लाख ऍन्टीजेन रॅपिड टेस्टिंग किट खरेदी केले. हे किट व त्याद्वारे नागरिकांच्या तपासणीसाठी तब्बल 5 कोटी 4 लाखांचा खर्च महापालिकेने केला आहे.
शहरात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाची चाचणी तातडीने व मोठ्या संख्येने व्हावी म्हणून पालिकेने शासन निर्णयानुसार 4 हजार स्टॅडर्ड क्यू कोविड 19 ऍन्टीजेन डिटेक्शन किट जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरेदी केले. एका किटद्वारे 25 जणांची चाचणी करता येते. हे किट हरियाणा येथील एस. डी. बायोसेन्सर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड कडून थेट पद्धतीने खरेदी करण्यात आले. तर, एका व्यक्तींच्या चाचणीसाठी 504 रूपये खर्च झाला आहे.
या ऍन्टीजेन रॅपिड किटच्या माध्यमातून शहरातील संशयित नागरिकांच्या मोठ्या संख्येने तपासणी केली जात आहे. जुलै 10 तारखेपासून ऍन्टीजेन किटद्वारे तपासणीस सुरूवात करण्यात आली. दररोज सुमारे 3 ते 4 हजार जणांचा चाचण्या घेतल्या जात आहेत. या चाचणीस केवळ 25 ते 30 मिनिटात करोनाचे निदान होत असल्याने बाधितावर तत्काळ उपचार करणे सुलभ होत आहे. परिणामी, संसर्ग वाढण्यास अटकाव होत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.