पिंपरी – वायसीएम’ रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेमध्ये रिक्त पदावंर भरती करण्यात येणार आहे. या भरतीला कोणाचाही विरोध नाही. कोविडच्या काळामध्ये डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र यामध्ये भेद केला जात आहे. जुन्या डॉक्टरांना डावलून त्याठिकाणी नवीन डॉक्टरांना गलेलठ्ठ पगार दिला जाणार आहे. 13 डॉक्टरांपैकी फक्त पाच डॉक्टरांची मागील मुलाखतीमध्ये कायमस्वरुपी निवड करण्यात आली. बाकीच्या डॉक्टरांना डावलण्यात आले.
कंत्राट पद्धतीवर घेतलेल्या डॉक्टरांना कायमस्वरुपी केले तर वायसीएम रुग्णालय महापालिकेच्या हातातून गेलेच समजा. त्यामुळे डॉक्टरभरती करावी, मात्र कायमस्वरुपी करावे की नाही याबाबत विचार करावा, असा सूर सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेच्या महासभेत लावला.
जुलै महिन्याची तहकूब सभा आज महापालिकेच्या सभागृहामध्ये पार पडली. महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सध्यस्थितीत सुरू असलेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनावर कडाडून टीका केली. तसेच डॉक्टरभरतीमध्ये भ्रष्टाचार होत असून जुन्या डॉक्टरांना डावलले जात असल्याचा आरोप केला.
याबाबत बोलताना संदीप वाघेरे म्हणाले, प्रशासनाचा अजिबात वचक नाही. डॉक्टरभरती करण्याला विरोध नाही, मात्र डॉक्टर हे कायमस्वरुपी घेऊ नका. त्यांना मानधनावरच घ्या. आज वायसीएम रुग्णालयामध्ये कंत्राटी डॉक्टर भरले आहेत. ते काय काम करतात याची चौकशी करा. शहरामध्ये सगळा गोंधळ सुरू आहे. ऑक्सिजन नसल्यामुळे नऊ रुग्ण दगावले आहेत. कोविडच्या रुग्णांकडे कोणी जात देखील नाही. हे कंत्राटी डॉक्टर फक्त डॉ. वाबळे यांच्या केबिनमध्ये बसून असतात. एखादा रुग्ण दगावून सहा तास उलटतात तरी या डॉक्टरांना तपास नसतो.
आयुक्त तुम्ही भेदभाव केला
नगरसेवक योगेश बहल म्हणाले, आयुक्त तुम्ही डॉक्टर सामावून घेताना भेदभाव केला आहे. तेरापैकी फक्त पाच डॉक्टर सामावून घेतले. नगरसेविका सीमा सावळे म्हणाल्या, वायसीएमच्या डॉक्टरांना वाटत की आम्ही त्यांच्या कामात हस्तक्षेप करू नये. म्हणजे मी उद्या माझा एखादा रुग्ण तपासा असा फोनही करू शकत नाही. मग डॉक्टरांच्या कायमस्वरुपी करण्याला पाठिंबा का देऊ? या डॉक्टरांना जर वायसीएम रुग्णालयाची मक्तेदारी दिली तर वायसीएम हातातून गेलेच समजा. नगरसेवक विकास डोळस म्हणाले, वायसीएममधील रुग्णांच्या प्रतिक्रिया रेकॉर्ड आहेत. रुग्णांनी सांगितले आहे की वायसीएममध्ये हाल होत आहेत. एका व्यक्तीची पत्नी पाच वाजता मयत झाली तर त्याची घोषणा रात्री दीड वाजता केली. याचा अर्थ वैद्यकीय यंत्रणेचे लक्ष नाही.
भरसभेत सत्ताधारी नगरसेवकांची आपसात जुंपली
वायसीएम रुग्णालयात चांगली सेवा मिळत नाही. तसेच शहरातील करोनाची परिस्थिती बिकट होत आहे. यावर सर्व पक्षातील नगरसेवकांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले. अनेक नगरसेवक प्रशासनावर तुटून पडले. तर नेमके यावेळी नगरसेवक व माजी पक्षेनेते एकनाथ पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी आपण डॉक्टरांना देवदूत म्हणत होतो. मग हे देवदूत आता राक्षस कसे झाले याचा उच्चार केला. यावरून नगरसेविका सीमा सावळे व एकनाथ पवार यांच्यामध्ये भर सभेतच जुंपली. सीमा सावळे म्हणाल्या, आम्ही काही कामचुकार डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच आम्हाला आलेले अनुभव सांगितले आहेत. आम्ही सगळ्या डॉक्टरांना चुकीचे नाही ठरवत.