- 401 नवीन बाधित
- 414 डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये आज 401 नवीन रुग्णांची भर पडली. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 1 लाख 9 हजार 435 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सोमवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 401 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. दिवसभरात 5 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 3 व शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील चिखली, पिंपरी व पिंपळे गुरव येथील तिघांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील मुळशी व आंबेगाव येथील दोघांचा मृत्यू झाला.
दिवसभरामध्ये 414 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 2 हजार 753 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2392 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 797 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 1309 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 3514 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 4823 इतकी आहे.
3809 जणांना लस
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील भोसरी व पिंपरीतील जिजामाता रुग्णालय हद्दीत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. भोसरी रुग्णालय परिसरात आज 79 तर जिजामाता रुग्णालय परिसरात 70 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आकुर्डी 39, सांगवी 39, तालेरा 66, थेरगाव 54, यमुनानगर 39 व वायसीएम रुग्णालयामध्ये 15 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरामध्ये 3809 जणांना लस देण्यात आली.
जिल्हा रुग्णालयात करोनाने महिलेचा मृत्यू
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात रविवारी (दि. 7) करोनाने 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर, नव्याने 20 रुग्ण करोनाबाधित झाले.करोनाने मृत्यू झालेली ज्येष्ठ महिला उंब्रज (ता. जुन्नर) येथील रहिवाशी आहे. तिला उपचारासाठी 26 फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयात नव्याने करोना पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे ताथवडे, पिंपळे गुरव, जुनी सांगवी तसेच भोर तालुक्यातील आहेत. करोनामुक्त झालेल्या 12 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. लोणावळा, औंध, पिंपळे गुरव, जुनी सांगवी, आळंदी, देहूगाव (ता. हवेली), भूगाव आदी परिसरातील हे रुग्ण आहेत. त्यामध्ये 7 पुरूष आणि 5 महिला रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 42 रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातील 17 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत 813 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 175 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 307 रुग्णांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविले आहे. 715 रुग्णांना होम क्वॉरंटाइन केले आहे.