मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची माहिती; वार्षिक तपासणीस सातारा रेल्वेस्टेशनपासून प्रारंभ
सातारा – केंद्रीय अर्थसंकल्पात पुणे-सातारा-मिरज-लोंढा या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी 540 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महासंचालक संजीव मित्तल यांनी दिली.
पुणे विभागाच्या वार्षिक तपासणीस गुरुवारी माहुली येथे सातारा रेल्वे स्थानकापासून सुरवात झाली. मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा, मुख्य विद्युत अभियंता एस. पी. वावरे, लोको ऑपरेशन विभागप्रमुख जोएल मॅकेन्झी, रनिंग रूम प्रमुख अरुणकुमार, लोको पायलट मुख्य निरीक्षक नितीन खोपडे उपस्थित होते.
मध्य रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलीस यांच्यावतीने सकाळी नऊच्या दरम्यान मित्तल व त्यांच्या टीमचे ढोल-ताशे व तुतारीच्या निनादात स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पुणे-सातारा-मिरज-लोंढा या 467 किलोमीटरच्या ट्रॅकच्या दुहेरीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 540 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे-कोल्हापूर या दरम्यानच्या विद्युतीकरणासाठी 154 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
दरम्यान, महिला लोको पायलट रूम व पायलट प्रशिक्षणासाठी पुणे मंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या व्हिडिओचे प्रकाशन मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी लोको ऑपरेशन विभाग व इंजिनचालकांना काही कामे करावी लागतात. लोको पायलट दोन गाड्यांच्या वेळेत विश्रांती घेतात, ती रनिंग रूम आणि लोको पायलट जेथून पुढच्या गाडीच्या प्रवासासाठी निघतो, ती क्रू बुकिंग लॉबी सुरक्षित ठेवण्याचे काम, याचे प्रात्यक्षिक मित्तल यांना दाखवण्यात आले.
मित्तल यांनी रनिंग रूमचे कौतुक केले. रेल्वेस्टेशनचे सुशोभिकरण, ओपन जिम, गुडस् यार्डसाठी झालेले बांधकाम, मेडिटेशन रूम, सोलर व लॉकर सुविधा, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र लोको पायलट व रनिंग रूमची पाहणी करून मित्तल यांनी समाधान व्यक्त केले. इन्स्पेक्शन कारमध्ये बसून त्यांनी ट्रॅक, पॉवर ग्रीड सप्लायरची पाहणी केली.
सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी महत्त्वाच्या असलेली रनिंग रूम व क्रू लॉबीवर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यवस्थेवरील माहितीपटाची निर्मिती ईएन फिल्म्सच्यावतीने करण्यात आली आहे. पाच मिनिटांच्या या माहितीपटात मध्य रेल्वेच्या पुणे विभागात रनिंग रूममध्ये देण्यात आलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सातारा रनिंग रूमचीही माहिती देण्यात आली आहे. हा माहितीपट यू ट्यूबवर उपलब्ध असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.