माती वाहून नेणाऱ्या डंपरमुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढले
भाटघर – भोर-कापूरहोळ रस्त्याचा उपयोग पुण्याच्या दिशेने जाताना होत असल्याने हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. मात्र सध्या माती डंपरने या रस्त्यावर जोरदार हजेरी लावल्याने येथील वर्दळीत अधिक भर पडली आहे. दररोज सुमारे 50 डंपर फुललोड माती भरून सुसाट वेगाने जाताना दिसत आहेत. याचा परिणाम डांबरी रस्त्यावर होणार असून, यावर्षी मार्च महिन्यापासूनच खड्डे पडण्याची शक्यता आहे.
या रस्त्यावर पावसाळा हंगाम व नंतरचा कालावधी असे मिळून पाच ते सहा महिने खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. पाऊस हंगाम संपल्यानंतर दिवाळीआधी खड्डे भरले जातात; परंतु यावर्षी पावसाळा दीर्घकाळ राहिल्याने डिसेंबर महिन्यात डांबरीकरणाने खड्डे भरले गेले. मात्र, वाढत्या डंपर वाहतुकीमुळे खड्ड्यापासून दिलासा मिळालेल्या वाहनचालकांना पुन्हा खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे.
यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने भोर-कापूरहोळ रस्त्यावरील खड्ड्यांनी रौद्ररूप धारण केले होते. रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्ड्यांचे जाळे पसरलेले होते. तात्पुरता इलाज म्हणून सप्टेंबर महिन्यात मुरमाने खड्डे भरण्यात आले होते; परंतु पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने खड्ड्यातील मुरूम वाहून गेला, यामुळे खड्डे पुन्हा उघडे पडले.
यावर्षी पाऊसही दीर्घकाळ असल्याने खड्ड्यांमुळे प्रवासी, वाहनचालक त्रस्त झाले होते. डिसेंबर महिन्यात डांबरीकरणाने खड्डे भरल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला; परंतु यावर्षी माती डंपरची फुल लोडने वाहतूक होत असल्याने व माती डंपरचे प्रमाणही अधिक वाढल्याने रस्त्याची दुर्दशा होणार, असून मार्च महिन्यातच हा रस्ता खड्डेमय होण्याची शक्यता आहे.