वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्लूएओवर टीकास्त्र सोडले आहे. डब्लूचओ चीनच्या हातचे बाहुले असून लवकर त्यांच्या विरोधात आम्ही काही शिफारशी आणणार असल्याचे व त्यानंतर चीन विरोधातही असेच पाउल उचलले जाणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ओव्हल हाउस येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या कारभारावर आम्ही नाखुश आहोत. त्यांनी आमची दिशाभूल केली आहे. करोना व्हायरसच्या संदर्भात डब्लूएचओच्या भूमिकेची आम्ही चौकशी सुरू केली असून यात चीनच्या भूमिकेबाबतही चौकशी केली जाणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेला सगळ्यांत जास्त निधी आम्ही देतो. त्यांना याबाबत आमच्यापेक्षा जास्त माहिती असायला हवी होती. मात्र आम्हाला जे माहित होते, तेही त्यांना माहित नव्हते. किंवा त्यांनी तसे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र आता सगळयांनाच ठाउक आहे की, जे चीनच्या हातचे बाहुले झाले आहेत. किमान माझा तरी असाच दृष्टीकोन आहे.