आघाडीतील जागावाटप ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात

राष्ट्रवादी कॉंग्रेसची 288 जागांवर चाचपणी : प्रदेशाध्यक्ष पाटील यांची माहिती

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात राजकीय पक्षांची मजबूत आघाडी उभारण्याची तयारी सुरू असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने 288 जागांसाठी चाचपणी सुरू केली आहे. दोन्ही कॉंगेससह अन्य पक्षांची ताकद पाहून जागा वाटप करण्याचे सूत्र मांडण्यात आले असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आघाडीतील जागा वाटप निश्‍चित होईल, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी येथे व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीची तयारी, इच्छुकांचे अर्ज आणि मतदारसंघातील संघटनात्मक बांधणी या बाबींच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नेत्यांची बैठक पुण्यात झाली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री छगळ भुजबळ उपस्थित होते. कॉंग्रेससोबत आता दोन दिवसांत बैठक घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत पक्षाला मिळालेली मते आणि आजची स्थिती या अनुषंगाने चर्चा करतानाच राष्ट्रवादीच्या ताब्यातील मात्र, हमखास विजय मिळणाऱ्या जागांवरील हक्क न सोडण्याचा आग्रह काही नेत्यांनी बैठकीत धरल्याचे सांगण्यात आले. पाटील म्हणाले, “कॉंग्रेससोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असून, अन्य पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात आहोत. मनसेला आघाडीत घेण्याबाबत कॉंग्रेस अनुकूल असली, तरी त्याबाबतचा निर्णय झालेला नाही.’

“सर्व 288 जागांसाठी पक्षाने अर्ज मागविले आहेत. त्यासाठी 875 अर्ज आहेत. त्यानुसार दि.23 ते 25 जुलैदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. त्याची जबाबदारी नेत्यांकडे सोपविली असून पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती मी स्वत: घेणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑगस्टमध्ये जागा वाटपाचे चित्र स्पष्ट केले जाईल,’ असेही पाटील यांनी सांगितले.

“रोजगाराच्या नावाखाली तरुणांची फसवणूक’
रोजगार देण्याच्या नावाखाली पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी तरुणांची फसवणूक केली आहे. या सरकारच्या योजना फसव्या आहेत. लोकांचा विचार न करता सरकार केवळ आपला अजेंडा रेटत असल्याची टीका जयंत पाटील यांनी भाजपवर केली. लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मते देत आहेत, पण विधानसभा निवडणुकीत तसे होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीनिमित्त पुण्यात आलेल्या पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे उपस्थित होते. राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांच्या सल्यानेच शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले आहे. सल्लागाराच्या भरवशावर शिवसेना राजकारण करीत असल्याचा टोलाही पाटील यांनी शिवसेनेला लगावला. पाटील म्हणाले, “भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी होते. मात्र, त्याचा अहवाल दिला जात नाही. अहवाल दिला जात नाही म्हणजे नक्‍कीच त्यात काहीतरी असणार आहे.त्यामुळेच अहवाल दडवून ठेवले जात आहेत. राज्यातील सरकारबद्दल जनतेच्या मनात चिड आहे. ती आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येईल.

दरम्यान, पुण्यातून पक्षाचे शहराध्यक्ष तुपे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली नसली तरी, त्यांना गरजेनुसार लढण्याचा आदेश दिला जाईल, मात्र ते पक्षात नाराज नाहीत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)