हैदराबाद – देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. हा गोळीबर अज्ञात दोन लोकांनी केला आहे. यात आरोपींनी चार राउंड फायर केल्या, अशी माहिती ओवेसी यांनी स्वत: ट्विटरवर दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात वापरलेली शस्त्र सापडली असून एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
असदुद्दीन ओवेसी यांनी माहिती देताना ट्विट केले की, काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. यात चार राउंड फायर झाल्या. ते तीन-चार लोकं होती. गोळीबार करुन सर्वजण पसार झाले. माझी गाडी पंक्चर झाली आहे. पण मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघून गेलो आहे.या घटनेमुळे आम्हाला सगळ्यांना धक्का बसला आहे, असे त्यांनी म्हणाले आहेत.
दरम्यान, ओवेसी हे मेरठच्या किठौर येथील एका प्रचाराच्या कार्यक्रमानंतर दिल्लीच्या दिशेला जात होते. यादरम्यान छिजारसी टोल प्लाजाजवळ त्यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी करण्यात येत आहे.