कोल्हापूर : कोल्हापुरात झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत भाच्याचा प्रथम क्रमांक आल्याने आनंदोउत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी बारा बोअर बंदुकीमधून चार राऊंड हवेत झाडल्याने अश्विन बाळासाहेब शिंदे (वय 37, रा. सद्गुरू कॉम्प्लेक्स ,उचगाव ता.करवीर) याच्यावर शस्त्र कायद्याचा भंग केल्याबद्दल गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हा प्रकार सोमवारी (ता.10) सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. 12 बोअरची लाकडी बंदूक व पुंगळ्या मिळून 25 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
अश्विन शिंदे याने आनंदाच्या भरात बंदुकीच्या फैरी झाडल्यानंतर त्या प्रसंगाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याची खातरजमा केली असता, झालेला प्रकार वस्तुस्थितीला धरून असल्याचे तपासणी अंती स्पष्ट झाले. म्हणून पोलिस नाईक अशोक कृष्णात पोवार (गांधीनगर पोलिस ठाणे) यांनी याबाबतची फिर्याद गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली.
त्यानुसार अश्विन शिंदे याच्यावर शस्त्र कायद्याखाली मंगळवारी 3.30 च्या दरम्यान गुन्हा दाखल केला आहे. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्ह्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याची तजवीज केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर करत आहेत.