पिंपरी – उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आग व इतर दुर्घटनाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अग्निशामक हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. असे असतानाही इतर विभागांप्रमाणे अग्निशामक विभाग देखील अपुऱ्या मनुष्यबळाच्या समस्येशी देखील झुंजत आहे.
पिंपरी-चिंचवड अग्निशामक विभागामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. या विभागामध्ये 273 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या 2 उप अग्निशामक अधिकारी, 27 लिडींग फायरमन, 40 कर्मचारी आणि 21 अग्निशामक वाहन चालक असे 89 अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. मोठी दुर्घटना घडल्यास अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मर्यादा येतात. त्यावर महापालिका प्रशासनाने तात्पुरता तोडगा काढत महाराष्ट्र अग्निशामक सेवा मुंबईच्या वतीने आलेले 50 प्रशिक्षणार्थींची 12 महिन्यांसाठी नियुक्ती करण्याचे ठरविले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग आणि नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. शहरात हजारो उद्योग आहेत. यामुळे आग व इतर दुर्घटना घडल्यास बचाव कार्यासाठी अग्निशामक दलाचे एकूण 31 आगीचे बंब आहेत. या विभागास वर्षभरात 1 हजार 200 पेक्षा अधिक कॉल्स आले आहेत. अग्निशामक विभागासाठी एकूण 273 कर्मचारी आवश्यक आहेत. परंतु 89 कर्मचाऱ्यांवरच शहराचा संपूर्ण भार आहे. शहरामध्ये कुठे आग लागल्यास या कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. अनेकदा एकाचवेळी एकापेक्षा अधिक दुर्घटना घडतात. अशावेळी या कर्मचाऱ्यांवर ताण येतो. या विभागामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक आहे. मात्र, तात्पुरत्या स्वरूपात महाराष्ट्र अग्निशामक सेवा केंद्रातील 50 प्रशिक्षणार्थींची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांना मासिक 20 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. त्यांना 12 महिन्यांसाठी नियुक्त केले जाणार आहे. त्यासाठी 10 लाखांच्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
मुख्य अधिकाऱ्यासह अनेक पदे रिक्त
महापालिकेचे मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे हे 31 ऑक्टोबर 2022 रोजी पालिका सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागेसाठी महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडे एकही पात्र अधिकारी नाही. मुख्य अग्निशामक अधिकारी या पदावर उप अग्निशामक अधिकाऱ्याला बढती मिळू शकते. मात्र, महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडे गेल्या कित्येक वर्षांपासून उप अग्निशामक अधिकारी, विभागीय अग्निशामक अधिकारी, सहाय्यक विभागीय अग्निशामक अधिकारी, अग्निशामक केंद्र अधिकारी ही पदे नवीन आकृतीबंधात मंजूर असूनही रिक्त आहेत. तर सध्या महापालिकेच्या अग्निशामक विभागात सब ऑफिसर, लिडींग फायरमन, फायरमन या पदावर कर्मचारी कार्यरत आहेत. तर मुख्य अग्निशामक अधिकारी पदासाठी एकही कर्मचारी पात्र नाही. त्यामुळे नवीन आकृतीबंधानुसार शासनाला अधिकारी मागण्यात येणार आहे. तसेच सध्या अग्निशामक विभागाचा पदभार क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे.