पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मार्केट यार्ड- गंगाधाम रस्त्यावर आई माता मंदिराजवळ एका गॅरेजमध्ये पहाटे आग लागली. आगीत १७ दुचाकी जळाल्या. आगीमागचे कारण समजू शकले नाही.पहाटे साडेतीनच्या सुमारास गॅरेजमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली.
त्यानंतर चार बंब आणि जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत गॅरेजमधील दुचाकींनी पेट घेतला हाेता. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आगीत १७ दुचाकी जळाल्या.
आग लागल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला होता. पहाटे झोपेत असलेल्या रहिवाशांना धूरामुळे जाग आली. आगीत कोणी जखमी झाले नाही.
गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकी जळाल्या असून काही दुचाकींना झळ पोहोचली आहे. आग तासाभरातच आटोक्यात आणली गेली. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी संजय रामटेके, कैलास शिंदे, तांडेल मनीष बोंबले, महादेव मांगडे आदींनी सहभाग घेतला.