पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील सुमारे ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी शुक्रवारी दिली.
यावेळी हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक पराग गोखले, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा निमंत्रक ह.भ.प. चोरघे महाराज, ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या विश्वस्त संगीता ठकार, कऱ्हे पठार खंडोबा मंदिर देवस्थानचे विश्वस्त अधिवक्ता मंगेश जेजुरीकर, चतुःशृंगी देवस्थानचे नंदकुमार अनगळ, हडपसर येथील तुकाई देवस्थानचे सचिव सागर तुपे आदी उपस्थित होते.
पुण्याप्रमाणे यापूर्वीच नागपूर, अमरावती, जळगाव, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर यांसारख्या अनेक जिल्ह्यांतील मंदिरांमध्ये ही वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. अन्य धर्मांची प्रार्थनास्थळे, महाविद्यालये, न्यायालय, पोलीस ठाणे आदी क्षेत्रांत वस्त्रसंहितेचे पालन होते. त्याच धर्तीवर महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचे घनवट म्हणाले.
तुळजापूर मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी विरोध झाला; मात्र त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली. त्याला काही जणांनी विरोध केला. परंतु मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे व्यक्तीस्वातंत्र्य असू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत, याचे स्वातंत्र्य आहे;
मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे. मंदिर विश्वस्तांनी या सर्वांचा विचार करून हा निर्णय घेतला त्यामुळे येथून पुढे मंदिरांचे पावित्र्य अबाधित राहील आणि संस्कृती रक्षणास मदतच होईल, असे यावेळी