कराड, (प्रतिनिधी) – आगाशिवनगर, ता. कराड येथील घनकचरा प्रकल्पाला बुधवारी (दि. 28) रात्री 10.30 च्या सुमारास आग लागली. या आगीत बेल्ट कन्व्हेअर, बेलिंग मशीन, सोलर पॅनेल, शेड, वायरिंग आणि इतर साहित्य जळून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. कराड नगरपालिका, कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशमन यंत्रणेच्या सहाय्याने पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आगाशिवनगर येथील घनकचरा प्रकल्पाला बुधवारी (दि. 28) रात्री 10.30 च्या सुमारास आग लागल्याचे स्थानिकांना दिसले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.
आगीचे लोळ उठत होते. याची माहिती मिळताच माजी नगरसेवक, पालिकेचे अधिकारी व कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी आगीची माहिती देताच कृष्णा रुग्णालय व कराड नगरपालिकेचे अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.