अकोला – आपल्या आक्रमक शैलीने सरकारला सतत धारेवर धरणारे सदावर्ते हे वकील दाम्पत्य आता अडचणीत येताना दिसत आहे. ऍड गुणरत्न सदावर्ते आधीच कारागृहात असून आता त्यांच्या पत्नीविरोधात देखील तक्रार दाखल झाली आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिस ठाण्यात जयश्री पाटील यांच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांना भूलथापा देत पैसे गोळा केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल कऱण्यात आली आहे.
एसटी कामगार सेनेच्या कार्याध्यक्ष विजय मालोकर यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते, त्यांच्या पत्नी ऍड. जयश्री पाटील आणि कामगार संघटनेचे अजयकुमार बहादूरसिंग गुजर यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत म्हटलं की, एसटी महामंडळात मागील ५ महिन्यांपासून बेकायदेशीर संप सुरू आहे. या संपादरम्यान कर्मचारी, पदाधिकारी हे वेगवेगळ्या लोकांमार्फत आर्थिक शोषण करून कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे जयश्री पाटील यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.