आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात काही खेळाडूंनी आपल्या गुणवत्तेने समीक्षकांनाच नव्हे तर विविध संघातील खेळाडूंनाही प्रभावित केले आहे. अनुज रावत हा त्यातीलच एक खेळाडू. यंदाच्या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून सहभागी झालेला अनुज आपल्या फलंदाजीतील अफाट गुणवत्तेने सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कोण आहे हा अनुज रावत.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत अवघ्या 22 वर्षांच्या अनुजने केवळ 47 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांसह 66 धावा केल्या. त्याला यंदाच्या स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात बेंगळुरूने तब्बल 3.40 कोटींना खरेदी केले होते. त्याची बेस प्राईस अवघी 20 लाख रुपये होती. त्याच्यावर बेंगळुरूसह सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सने देखील बोली लावली होती.
अनुज गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळला. मात्र, त्याला केवळ दोनच सामने खेळवण्यात आले होते. यंदा मात्र त्याला बेंगळुरूने सातत्याने खेळवले व त्याने आपल्या गुणवत्तेची साक्षही दिली. तो मूळचा नैनितालमधील रामनगर या गावचा असून क्रिकेटपटू बनण्यासाठी त्याने वयाच्या 10 व्या वर्षी दिल्लीत क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. तो एका शेतकरी कुटुंबातील असूनही त्याला घरातून क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी प्रचंड पाठिंबाही मिळाला.
रामनगरमध्ये क्रिकेटसाठी कोणतेही अनुकूल वातावरण तसेच सुविधा किंवा अकादमी नसल्याने वडिलांनी त्याला दिल्लीला पाठवले. 2016-17 साली दिल्लीच्या 19 वर्षाखालील संघात त्याची निवड झाली. भारताच्या 19 वर्षाखालील संघाकडूनही तो आशिया करंडक स्पर्धेत खेळला. 2017 साली त्याने रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले. त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पाच डावांत 15 चौकार आणि 10 षटकारांची आतषबाजी करत आपली उपयुक्तता सिद्ध केली. यंदाच्या मोसमात झालेल्या विजय हजारे स्पर्धेत त्याने आपल्या खेळाने थेट विराट कोहलीलाच प्रभावित केले व कोहलीने लिलावात त्याच्यासाठी फिल्डिंग लावली व आपल्या संघात घेतले.
रणजी स्पर्धेत पहिल्या दोन्ही सामन्यात अर्धशतक फटकावत अनुजने आपली आक्रमकता व तंत्र दोन्ही दाखवून दिले. 2018 साली त्याने मध्य प्रदेशविरुद्ध 134 धावांची वादळी खेळी केली. त्याने आतापर्यंत 31 टी-20, 22 प्रथमश्रेणी व 20 लिस्ट ए सामने खेळले आहेत. लिस्ट ए मध्ये त्याने 573, प्रथम दर्जाच्या सामन्यांत 954 तर, टी-20 सामन्यांत 614 धावा केल्या आहेत. आता यंदाच्या स्पर्धेत त्याने अशीच सरस कामगिरी केली तर त्याचा भारतीय टी-20 संघात निश्चितच समावेश होईल असा विश्वास वाटतो. वीरेंद्र सेहवागचा वारसदार अशी बिरुदावली मिरवणाऱ्या अनुजसमोर मोठी कारकीर्द असून तो यात यशस्वी होईल असा विश्वासही वाटतो.