नगर – नवीन वर्ष सुरू व्हायला केवळ दोन दिवस बाकी आहेत. थर्टी फर्स्टला नागरिक नववर्षाचे स्वागत मोठा जल्लोषात करतात. तारांकित, बार, धाबा चालक, आणि इतर हॉटेल चालक सुद्धा पार्टीचे धुमधडाक्यात आयोजन करतात.
थर्टी फर्स्टला मद्याची विक्री मोठ्या जोमात होत असते. तरूणाई बेभान होवून नाच-गाणं, दारूत झिंगणार असते. डीजेचे कर्कश संगीत आणि मद्यात धुंद होऊन बेभान नाचणाऱ्या तरुणाईला थर्टीफर्स्टच्या दिवशी काही पारावर राहत नाही. नशेतील नागरिकांना पेग सिस्टीम मध्ये दारू किती दिली, याचे त्यांना भान राहत नाही.
याच संधीचा फायदा हॉटेल मालक घेवून कमी दारू देतात. मात्र, मद्य विक्री करणाऱ्या बार चालकांनी आता सावध होणे गरजेचे आहे. कारण, 90 मिलिलिटर पेक्षा मापात 1 मिलीलिटरही दारू कमी दिली तर पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे, वैधमापन शास्त्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तुम्ही जर थर्टीफर्स्टला पार्टी करायला तारांकित हॉटेलात जाणार असाल आणि मद्यपान करणार असाल तर दारूच्या पेगच्या मापाची खात्री करा. अन्यथा आपली दारूच्या मापात फसवणूक होऊ शकते. ही दक्षता ग्राहकांनी घ्यायला हवी. हॉटेल चालकांनी पेग पद्धतीत एक मिली जरी दारू ग्राहकांना कमी दिल्यास पाच हजार रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे.
थर्टी फर्स्टला नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वच हॉटेलमध्ये-बारमध्ये नागरिकांची गर्दी असणार आहे. या हॉटेलांमध्ये – बारमध्ये 90 मिली पेगच्या मापात दारू दिली जाते. अशा वेळी तेथे पेग मधून दिलेली दारू कमी आहे, असे आढळल्यास आणि नागरिकांनी तशी तक्रार केल्यास पाच हजार रुपयांच्या दंडासह गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे हॉटेल वा बार चालकांनी सावध होणे गरजेचे आहे.
ग्राहकांना कमी माल देणे हा गुन्हा आहे. हे केवळ थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी नाही. कुठल्याही मापात पाप केल्यास वैधमापन शास्त्र विभागाकडून कारवाई केली जाते. तसेच दारूच्या मापात देखील कमी दारू दिल्यास पाच हजारा रुपयांच्या दंडासह खटला चालविला जाऊ शकतो. ग्राहकांकडून तक्रार आल्यास त्याची तपासणी केली जाईल. आणि मापामध्ये कमी दारु आढळल्यास नाशिक विभागाकडून दंडासह गुन्हे दाखल करण्यात येतील.
ए. टी. गेटमे, सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र विभाग