पुढील मंगळवारी चौदा पंचायत समिती सभापती-उपसभापतींची निवड
नगर – जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड मंगळवारी,दि. 31 डिंसेबरला होत असताना जिल्ह्यातील चौदा पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतींच्या निवडीची तारीखही आता जाहीर झाली आहे. मंगळवारी,दि.7 जानेवारी रोजी या निवडी त्या-त्या पंचायत समितीत होतील. दरम्यान, जामखेड पंचायत समितीचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीसाठी निघाले आहे.
जामखेड येथील आरक्षण तेथे उपलब्ध नसलेल्या प्रवर्गाचे निघाल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. ते येईपर्यंत पंचायत समिती पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाला जाहीर करता येत नव्हता. ते आल्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयात हे आरक्षण चिठ्ठीव्दारे काढण्यात आले. ते नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी निघाले.
त्यामुळे आता चौदाही पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधीत सर्व 146 पंचायत समिती सदस्यांना आजच नोटिसा पाठविण्यात आल्या असून त्या पाठविल्यानंतर सात दिवसानंतर या निवडी घेतल्या जातात. त्यानुसार त्या मंगळवार,दि.7 जानेवारीला घेतल्या जाणार आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापतींची मुदत शुक्रवारी,दि.20 रोजी संपली होती. शासनाच्या निर्देशानुसार दि. 20 नंतर या निवड प्रक्रिया राबविल्या जात आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम निवडणूक अधिकारी तथा जिल्हधिकारी राहुल व्दिवेदी यांनी जाहीर केला.
मात्र जामखेड पंचायत समितीचे सभापतीपदाचे आरक्षण हे अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी पडले होते.पण तेथे या प्रवर्गातील सदस्यच नव्हता. त्यामुळे येथे नव्याने आरक्षण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाचे मार्गदर्शन मागविले होते. जोपर्यंत याबाबत शासन निर्देश देत नाही तोपर्यंत सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर करता येत नव्हता. अन्यथा जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम एकाच दिवशी घेण्याचे नियोजन होते.