उद्यापासून रिक्षाचालकांच्या खात्यात जमा होणार अर्थसहाय्य

पिंपरी – राज्य सरकारकडून राज्यात संचारबंदी व कडक निर्बंध लागू करण्यात आले. तेव्हाच सरकारने रिक्षा परवानाधारकांना दिड हजार रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली होती. याबाबतची मदत वितरण प्रणाली तयार करण्यात आली असून येत्या शनिवारपासून (दि.22) परवानाधारक रिक्षाचालकांच्या थेट खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

लॉकडाऊन व अनेक निर्बंध लावण्यात आल्याने रिक्षाधारकांना देखील मोठा फटका बसला आहे. राज्य शासनाने विविध घटकांना अनुदान जाहीर केले असून, यात रिक्षा परवानाधारकांचा देखील समावेश करण्यात आला होता. याबाबत परिवहन विभागाने सर्व परवानाधारक रिक्षाचालकांना आपले बॅंक खाते लिंक करण्याचे आवाहन केले होते.

यामुळे रिक्षा परवानाधारकांना थेट खात्यात अनुदान मिळणे सोपे होणार आहे. संबंधितांच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम जमा करण्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्रणाली विकसित करण्यात आली असून आयसीआयसीआय बॅंकेमार्फत प्रणाली तयार करण्यात आली आहे.

येत्या शनिवारपासून परवानाधारक रिक्षाचालकांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. राज्यात सुमारे 7 लाख 20 हजार परवानाधारक रिक्षाचालक असून त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. वाहन विभागाच्या transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर याबाबतची लिंक उपलब्ध होणार आहे. संबंधित ठिकाणी रिक्षा चालकांनी ऑनलाइन माहिती भरल्यानंतर त्याचे व्हेरीफीकेशन होईल. यानंतर परवानाधारकांच्या खात्यात काही मिनिटांत ऑनलाइन रक्कम जमा होईल. अशी माहिती विभागीय परिवहन कार्यालयाकडून मिळाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.