नगर – कोविड-19 मुळे या वर्षीच्या रखडलेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकास अखेर मुहूर्त मिळाला आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या सोमवारी (ता. 19) महापालिकेची अर्थसंकल्पी महासभा बोलाविण्यात आली आहे.
सकाळी 11 वाजता महापालिकेच्या मुख्यालयातील राजमाता जिजाऊ सभागृहात होणाऱ्या या सभेला नगरसेवकांना झूम ऍपद्वारे सहभागी होता येईल. महापालिकेच्या अंदाजपत्रक मंजुरीसाठी दरवर्षी फेब्रुवारीच्या अखेरच्या किंवा मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही महासभा होणे अपेक्षित असते. तथापि, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ही सभा होऊ शकली नाही, असा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून करोना विषाणूचा विळखा घट्ट होत गेला. त्यामुळे अर्थसंकल्पी महासभाच होऊ शकली नाही. दरम्यान, मागील आठवड्यात विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी प्रशासनाला धारेवर धरत अर्थसंकल्पी महासभा बोलाविण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावरुन तातडीने अर्थसंकल्प महापौर कार्यालयास सादर करण्याचे आश्वासन
प्रशासनाने दिले होते. महापालिकेचा अर्थसंकल्पच मंजूर नसल्याने कोणत्याही विकासकामांसाठी निधी खर्च करण्यात प्रशासनाला मर्यादा आल्या आहेत. त्यात आता उत्पन्नही घटलेले आहे. परिणामी शहरातील बहुतेक विकासकामे ठप्प झालेली आहेत. शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावरुन सभेत खडाजंगी होण्याची दाट शक्यता आहे.