मांडवगण फराटा -शिरूरच्या तालुक्याच्या पूर्व भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी जोरदार रंगीत तालीम सुरू झाल्याचे दिसून येत आहे. शिरूर तालुक्यातील काही सोसायट्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या तर काही संस्थाच्या निवडणुका सुरू आहेत.
शिरूरच्या तालुक्याच्या पूर्व भागातील आंधळगाव, शिरसगाव काटा, कोळगाव डोळस, नागरगाव, गणेगाव दुमाला, बाभूळसर बुद्रुक, सादलगाव, न्हावरे, राक्षेवाडी आदी गावांत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला निर्वीवाद वर्चस्व राखण्यात यश आले. परंतु या भागातील सर्वात मोठी संस्था असलेल्या मांडवगण फराटा सोसायटीत मात्र परिवर्तन करण्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या गटाला अपयश आले आहे.
यावर्षी प्रथमच सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणित पॅनेल गावोगावी उभे करण्यात आले. ही सर्व येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम समजली जाते. करोनानंतर सर्वत्र निवडणूका मोठ्या ताकदीने लढवल्या गेल्या. यामध्ये साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर करत मतदारांना आपल्या गटाकडे आकर्षित करण्याचा सर्व गटाकडून प्रयत्न करण्यात आला.
गेल्या दोन वर्षांत कुठलाही मोठा राजकीय आखाडा म्हणजे निवडणुका न झाल्याने पुढारी, कार्यकर्ते हिरमुसले होते. पण निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या बिनविरोध होण्यासाठी कमी प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील शिरसगाव काटा, बाभूळसर बुद्रुक, सादलगाव आदी गावांतील सोसायट्या बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले.परंतु काही ठिकाणी मात्र निवडणुकांत पैशाचा धूर निघाल्याचे दिसून आले.
सध्या सोसायटींच्या निवडणुकांमध्ये आर्थिक वापर झाला असल्याची चर्चा गावागावांतील पारावर रंगली आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून निवडून आलेले उमेदवार जनतेची कामे कितपत प्रामाणिकपणे करणार असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे. निवडणुका होण्यासाठी सोसायट्यांचा होतोय लाखो रूपये खर्च सर्वत्र निवडणूका जाहीर झाल्यानंतर निवडणूक पार पडेपर्यंत लहान
मोठ्या संस्थाना करावा लागत असतो.सर्व खर्च त्या विकास संस्थेला करावा लागतो.निवडणुका बिनविरोध झाल्या तर हा खर्च वाचणार आहे. या भागातील नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी संबंधित पनेलला महत्त्व न देता सामाजिक दृष्टीने सक्षम उमेदवार निवडण्यावर भर दिला आहे. त्यामुळे सर्वत्र समिश्र निकाल पाहायला मिळाले.