मुंबई – आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वादग्रस्त पोस्ट करून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल अभिनेत्री कंगना राणावत हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली शिख गुरूद्वारा व्यवस्थापन समिती आणि शिरोमणी अकाली दल यांच्यासह अमरजितसिंह (वय 47) यांनी हा गुन्हा नोंदवला आहे. कंगनाच्या हिंदी आणि इंग्लिशमध्ये लिहलेल्या पोस्टवरून 21 नोव्हेंबरला फिर्याद दाखल करण्यात आली होती.
खलिस्तानी दहशतवादी आज सरकारचे हात बांधत असतील.. मात्र त्यांनी विसरू नये एका महिला पंतप्रधानाने त्यांना आपल्या चपलेखाली चिरडले होते… त्यासाठी काय किंमत चुकवावी लागली त्याला महत्व नाही… त्यांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावत एखाद्या डासाप्रमाणे चिरडले… मात्र देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत… त्यांच्या मृत्यूला अनेक दशके उलटली… पण आजही ते त्यांचे नाव ऐकताच भीतीने कापतात… त्यांना त्यांच्यासारखाच गुरू मिळायला हवा, असे ट्विट केले होते. शिख धर्म, त्यांच्या श्रध्दा आणि विश्वासाला या ट्विटमुळे धक्का पोहोचला असे या एफआयआरमध्ये नमूद केले आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलन खलीस्तान चळवळ आणि शिख समाज म्हणजे खलिस्तानवादी दहशतवादी असे चित्र उभा करण्याचा प्रयत्न कंगनाने जाणीवपूर्वक केला आहे, असे समितीने म्हटले आहे. 1984 आणि त्या आधी झालेल्या नरसंहाराच्या खपल्या तिने काढल्या आहेत. हा एक नियोजनबध्द कट असल्याचा दावा त्यांनी केला.
आम्ही अभिनेत्रीविरूध्द कलम 295 ए नुसार गुन्हा दाखल केला आहे. आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत.
– गजानन काब्दुले, (वरीष्ठ निरीक्षक, खार पोलिस स्थानक)