पुणे : पीएमआरडीए निवडणूकीत कॉंग्रेसने राष्ट्रवादी आणि शिवसेनेची विनंती डावलत कॉंग्रेसने उमेदवार उभा केला होता. त्यावेळी कॉंग्रेस आघाडी धर्म विसरला असल्याची टिका राष्ट्रवादीने केली होती. त्यानंतर आता कॉंग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाना साधला असून स्मार्ट सिटीच्या सिंग्नल यंत्रणेवरील 55 कोटींच्या उधळपट्टीला मुख्यसभेत मान्यता देत भाजपशी हात मिळवणी करणाऱ्या अघाडीतील घटकपक्षांनी आत्मपरिक्षण करावे असा सल्ला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला आहे.
बागवे यांनी दिलेल्या प्रसिध्दीस पत्रकानुसार, या 58 कोटी रूपयांचे काम भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याच्या संबंधित ठेकेदाराला मिळाले आहे. कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक या बाबतीत सभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि कॉंग्रेस पक्षाने या प्रकल्पाला विरोध केला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही पत्रकार परिषद घेवून या प्रकल्पाला विरोध केला होता आणि आंदोलनही केले होते. कॉंग्रेस पक्षाची भूमिका सुरूवातीपासूनच या ठरावाला विरोधाची होती आणि म्हणून मुख्य सभेमध्ये कॉंग्रेस पक्षाने या विरूध्द आवाज उठविला आणि प्रस्तावाला प्रखर विरोध करून विरोधी मतदानही केले. या उलट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भाजपशी हातमिळवणी करून प्रस्तावाच्या बाजूने मतदान कले.
महाविकास आघाडीने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने गेल्या 5 वर्षात केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे ठरविले होते. असे असताना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ऐन वेळी घुमजाव करून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सहकार्य केले. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आघाडीचा धर्म न पाळता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत केली हे चिंताजनक आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आत्मपरीक्षण करावे. ज्या उद्देशाने महाविकास आघाडीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम केले त्याच महाविकास आघाडीतील घटक पक्षाने पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मदत करून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाला प्रोत्साहन दिला असल्याचा आरोप बागवे यांनी केला आहे.