पुणे : अॅडमिनचे हक्क काढून घेत चित्रपट दिग्दर्शकाचे फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॅंकर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय संजय इंडीकर (वय 29, रा. आकाशवाणी कॉलनी, गणेशखिंड रस्ता, मॉडेल कॉलनी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. इंडीकर यांचा चित्रपट निर्मितीचा व्यवसाय आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे अक्षय इंडीकर नावाने फेसबुकवर खाते आहे. त्याचा वापर ते व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी करीत. त्यांच्या खात्याला सहा पेज लिंक आहेत. ते हाताळण्याचे अधिकार इंडीकर आणि त्यांच्या पत्नीकडे आहेत. 23 सप्टेंबर रोजी इंडीकर यांच्या पेज अॅडमिन ऍक्सेसच्या नोटीफिकेशनमध्ये माहिती आली की, त्यांच्या खात्यात महम्मद मुदासीर, महम्मद इलियास हे दोन अकाऊंट जोडले गेले आहेत. त्यामुळे इंडीकर यांनी फेसबूक पेज पाहिले असता त्यांना अॅडमिन पदावरून हटविले असल्याचे समजले.
त्याबरोबर त्यांच्या विविध सहा पेजवर देखील वेगवेगळे अज्ञात व्यक्तींची खाती अॅड झाल्याचे दिसून आले. 28 सप्टेंबर रोजी इंडीकर यांच्या पेजवर अश्लील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी त्वरित पोलिसांत तक्रार दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस उप निरीक्षक अनिल डफळ करीत आहेत.