मांजरी बुद्रुक रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा व अधिकऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने एकाला जीव गमवावा लागला
मांजरी : मांजरी बुद्रुक येथे महादेव मंदिर वळण रस्त्यावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. याची गंभीर दखल घेत मांजरी बुद्रुक सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार व संबंधित पीएमआरडीए अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मांजरी बुद्रुक आम आदमी पार्टीचे राजेंद्र साळवे यांनी केली आहे.
मांजरी बुद्रुक रेल्वेगेट ते मुळा-मुठा नदीपर्यंत पीएमआरडीएकडून सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे हे काम वाहनचालकांना अपघात ठरत असून रोज त्या ठिकाणी अपघात होत असून ठेकेदार व अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे वाहन चालकांचे जीव धोक्यात आले आहेत. शनिवारी झालेल्या अपघात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे काम करणारे ठेकेदार व पीएमआरडीएच्या अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी राजेंद्र साळवे तसेच शैलेंद्र बेल्हेकर यांनी केली आहे.
रस्त्याचे काम करत असताना वाहन चालकांच्या दृष्टीने पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे दररोज लहान – मोठे अपघात घडत आहेत. त्यातच शनिवारी एका दुचाकीस्वराला आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्याचे काम करताना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही तसेच वाहतूक धोक्यात येणार नाही यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात तसेच काळजी घ्यावी याबाबत स्थानिक नागरिकांनी तसेच हडपसर वाहतूक पोलिसांनी वारंवार सांगूनही अधिकारी व ठेकेदार यांनी जुजबी काम केल्यामुळे एका दुचाकी वाहनाचा अपघात झाला याला कोण जबाबदार? ठेकेदाराला कोण पाठीशी घालताय? या सर्व बाबींची चौकशी करा.
अपघातात अनेक जण गंभीर जखमी होत असून आज एकाला प्राण गमवावे लागले आहेत जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आम आदमी पार्टी व अखिल मांजराईनगर नागरिक कृती समितीच्या वतीने राजेंद्र साळवे यांनी केली. हडपसर पोलिसांनी निःपक्षपातीपणे चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा मांजरी बुद्रुक आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.
आज झालेल्या तरुणाच्या अपघाती मृत्युला जबाबदार ठेकेदार आणि पीएमआरडीएचे आयुक्त देखील आहेत.सूचना फलक ,रिफ्लेक्टर कुठेच लावले नाहीत त्यामुळे वाहन चालकाला अंदाज येत नाही.परिणामी अशा दुर्दैवी घटना घडतात.
शैलेंद्र बेल्हेकर, स्थानिक नागरिक, मांजरी बुद्रुक