पिंपरी – कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी खासगी जागेतील कचरा भरून करारनाम्याचा भंग करणाऱ्या महापालिकेच्या एजी इनव्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनी या ठेकेदार आणि आठ जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड येथील कस्पटे वस्तीमध्ये रविवारी (दि. 7) ही घटना घडली.
महापालिकेचे आरोग्य निरीक्षक शशिकांत शिवाजी मोरे (वय 37, रा. थेरगाव) यांनी रविवारी (दि. 7) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी एजी इनव्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनी, रुपेश भागुजी जगताप (वय 44, रा. भोंडवे वस्ती, वाल्हेकरवाडी), गणेश तुकाराम अर्जुने (वय 32, रा. पडवळनगर, थेरगाव), आशुतोष लुईस मकासुरे (वय 28, रा. नखाते वस्ती, रहाटणी), आरीफ मेहबूब मकाशी (वय 22, रा. साईनाथनगर, थेरगाव), रोहित भाऊसाहेब सरवदे (वय 21, रा. आनंदनगर, चिंचवड स्टेशन), संतोष बिभिषण कांबळे (वय 30, रा. रिव्हर रोड, पिंपरी), एजी इनव्हायरो कंपनीचे सुपरवायझर प्रतीक तावरे (वय 26, रा. मारूंजी, हिंजवडी), प्रोजेक्ट हेड तानाजी पवार, (रा. ओम क्लासिक सोसायटी, प्राधिकरण, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास आरोपींनी परस्पर संगनमत करून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी कस्पटे वस्ती, वाकड येथील शौर्य हॉटेलच्या बेसमेंटमधील खासगी कचरा एम.एच.14 /एच.क्यू./3248, एम.एच. 14 /एच.जी./6508, एम.एच.14/एच.यू./3250 या वाहनांमध्ये भरून करारनाम्याचा भंग केला. तसेच एजी इनव्हायरो कंपनीने विश्वासघात करून महापालिका आणि शासनाची लाखो फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिंगारे तपास करीत आहेत.