Malaysia Masters 2024 (Badminton) : दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने चमकदार कामगिरी करत मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी (Quarter Final) गाठली. सिंधूने दुसऱ्या फेरीत अटीतटीच्या लढतीत कोरियाच्या सिम यू जिनचा तीन गेममध्ये पराभव केला. सिंधूचा यु जिनविरुद्धचा हा तिसरा विजय आहे. माजी जगज्जेती आणि जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असलेल्या सिंधूने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत कोरियाच्या 34व्या क्रमांकाच्या यू जिनचा 21-13 12-21 21-14 असा 59 मिनिटांत पराभव केला.
सिंधूने पिछाडीवरून केले पुनरागमन…
सिंधूने सामन्यात संथ सुरुवात केली आणि पहिल्या गेममध्ये 3-7 ने माघे पडली. मात्र, भारतीय खेळाडूने पुनरागमन करत ब्रेकमध्ये 11-10 अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर सलग सात गुणांसह पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. ब्रेकमध्ये यू जिनने 11-10 आणि खेळ पुन्हा सुरू झाल्यावर 14-10 अशी आघाडी घेतली. कोरियन खेळाडूने पुढील नऊपैकी सात गुण जिंकून सामना तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये नेला. निर्णायक गेममध्ये यू जिनने पुन्हा एकदा चांगली सुरुवात करत 5-1 अशी आघाडी घेतली. सिंधूने स्कोअर 6-6 केला आणि त्यानंतर 13-9 अशी आघाडी घेतली. तिने 16-14 च्या स्कोअरवर सलग पाच गुण घेत हा गेम आणि सामना आपल्या नावावर केला.
सिंधूचा सामना आता ‘हेन युई’शी होणार
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करताना हैदराबादची 28 वर्षीय सिंधू अव्वल फॉर्म शोधण्यात अपयशी ठरली आहे. पाचव्या मानांकित सिंधूचा पुढच्या फेरीत अव्वल मानांकित हेन युईशी सामना होईल. या चिनी खेळाडूने गेल्या महिन्यात निंगबो येथे झालेल्या आशिया बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा पराभव केला होता. 2022 मध्ये सिंगापूर ओपनमध्ये यापूर्वीचे विजेतेपद जिंकणाऱ्या सिंधूचा जगातील सहाव्या क्रमांकाच्या खेळाडूविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. भारतीय खेळाडूने हेन युईविरुद्ध सहापैकी पाच सामने जिंकले आहेत.
World Para Athletics Championships 2024 : सचिन खिलारीचे सर्वोत्तम कामगिरीसह सुवर्णयश….
दुहेरी प्रकारात भारताची निराशा …
इतर लढतींमध्ये, मिश्र दुहेरीत बी सुमीथ रेड्डी आणि एन सिक्की रेड्डी यांना चेन तांग जी आणि तोह ई वेई या अव्वल मानांकित मलेशियाच्या जोडीकडून 9-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे सिमरन सिंघी आणि रितिका ठकार यांना महिला दुहेरीत पर्ली टॅन आणि थिनाह मुरलीधरन या दुसऱ्या मानांकित मलेशियाच्या जोडीविरुद्ध 17-21, 11-21 असा पराभव स्वीकारावा लागला.