शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कामगार सेलची आढावा बैठक
पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस कामगार सेलचा वतीने कामगार सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी आढावा बैठक संपन्न झाली. सरकार विरोधात निषेध सभा व निदर्शने करण्यात येणार आहे. तसेच कामगार कायद्याविरोधात विधेयकाच्या संदर्भात निवेदने तयार करुन तहसीलदार, कामगार आयुक्त, राज्य कामगार मंत्री, आणि केंद्रीय कामगार मंत्री यांना देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ व कामगार कृती समितीच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देऊन त्यामध्ये सहभागी होणे आदी विषयावर बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कामगार सेलचे मुख्य सल्लागार अरुण बोऱ्हाडे, अध्यक्ष किरण चंद्रकांत देशमुख, सल्लागार विजय लोखंडे, सुदाम शिंदे, राकेश चौधरी, सतिश देशमुख, शिवाजी वलवणकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस सेलचे अध्यक्ष किरण देशमुख म्हणाले, केंद्र सरकारने 22 सप्टेंबरला संसदेत विरोधकांच्या अनुपस्थितीत कामगार सुधारणा कायदा मंजूर करून घेतला. कायदा करताना कामगार संघटनांना पण विश्वासात घेतले गेले नाही. कायम स्वरूपातील कामगारांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेण्याची किंवा कमी करण्याचे अधिकार मंजूर झालेल्या कामगार विधेयकात कंपनीला देण्यात आले आहे.
कंपनी विरोधात संप करण्यासाठी आधी कंपनी व्यवस्थापणाला लेखी कळवावे लागेल त्यानंतरच संप करता येणार आहे. 300 कामगारापर्यंतच्या कोणत्याही कंपनीला आपली कंपनी केव्हाही बंद करण्यासाठी सरकारची पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. सरकारला कळविण्याची गरज नाही. सरकारचे हे धोरण कामगारांच्या विरोधात असून मालक वर्गाला साथ देणारे आहे.