- वाकड पोलिसांची कारवाई
- 175 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त
पिंपरी – दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात वाकड पोलिसांनी तीन सराईतांना अटक केली असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह चोरीचा एकूण पंधरा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. यामध्ये 13 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हस्तगत केलेल्या ऐवजामध्ये 175 ग्रॅम सोन्याचे दागिने, 16 दुचाकी व रोख रकमेसह एकूण 15 लाख आठ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी (दि.5) झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ही माहिती दिली.
पहिल्या गुन्ह्यात दिलीप विश्वनाथ काळे (वय 38) आणि रवि उर्फ रोहित अनिल मारवे (वय 21, दोघेही रा. म्हारळगाव,पाईपलाइरन, पो. वरप ता. कल्याण, जि.ठाणे) हे दोन सराईत ताथवडे येथील निलकमल हॉटेलसमोरील सर्व्हिसरोडवर संशयास्पदरित्या थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेतले असता, त्यांचा साथीदार ाअर्जुन शंकर काळे याच्यासह वाकड, चिंचवड व देहूरोड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 13 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून 175 ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन दुचाकी, रोख सहा हजार रुपये व एक मोबाईल असा एकूण 9 लाख 78 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. हे दोन्ही सराईत आरोपी असून, त्यांच्यावर मानपाडा, उल्हासनगर व कापुरबावाडी पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.
दुसऱ्या गुन्ह्यात वाहनचोरीतील अक्षय अनिल काशीद (वय 24, रा. थेरगाव) याला कस्पटेवस्ती येथील हॉटेल ऍम्बियन्ससमोर सापळा रचुन ताब्यात घेतले. त्याने मौजमजेकरिता वाकड, सांगवी, पिंपरी, चिंचवड या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून एकून 13 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यातील नऊ दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असून, उर्वरित चार दुचाकींचा तपास सुरु आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास केला.