पोप फ्रांसिस धोक्‍याची सुचना धुडकाऊन इराकच्या दौऱ्यावर

ख्रिश्‍चनांच्या सुरक्षा स्थितीचीही करणार विचारपुस

बगदाद – करोना आणि सुरक्षेचा धोका पत्करून पोप फ्रांसिस हे इराकच्या दौऱ्यावर गेले आहेत. इराकमध्ये ख्रिश्‍चन नागरीकांची संख्या रोडावत आहे, त्याबद्दल तेथील प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी तसेच तेथील युद्धजन्य स्थितीत तेथे शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या संबंधात तेथील प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी त्यांनी हा दौरा आयोजित केला आहे.

दरम्यान पोपच्या स्वागताची तेथे जय्यत तयारी करण्यात आली असून बगदादमध्ये त्यांच्या स्वागताचे फलक मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत. तेथे धार्मिक बंधुभावाला प्रोत्साहन देणारेही फलक लावण्यात आले असून आपण सारे एक आहोत हा संदेशही त्यातून देण्यात आला आहे.

इराकच्या विदेश मंत्र्यांनी सांगितले की पोपच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक आहोत. त्यांचा हा दौरा म्हणजे मशिदीचे मिनार आणि चर्चची बेल यांचे मनोमिलन ठरणार आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांचा हा दौरा तीनदिवसांचा असणार असून या दौऱ्यात ते शिया पंथीय धर्मगुरू अली अल सिस्तानी यांच्याशीही चर्चा करणार आहेत.

इराक मधील ख्रिश्‍चन धर्मियांच्या सुरक्षेच्या संबंधातही ते इराकी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. ज्या देशात इस्लामिक स्टेटच्या दहशतवादी कारवायांमध्ये ख्रिश्‍चन समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे त्या देशांचा दौरा करण्याचा फ्रांसिस यांचा मनोदय असून त्यातलाच हा पहिला इराक दौरा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.