शेतकरी आंदोलानातील महिला टाईमच्या मुखपृष्ठावर

नवी दिल्ली  – देशांत सुरू असणाऱ्या शेतकरी निदर्शनात सहभागी झालेल्या महिलांचे छायाचित्र टाईम मासिकाच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीच्या मुखपृष्ठावर छापले आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या दिल्लीच्या टिकरी सीमेवर सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या अग्रभागी असणाऱ्या शेतकरी महिलांचा गट असे त्यावर छापले आहे.

या अंकात शेतकऱ्यांच्या निदर्शनात आघाडीवर असणाऱ्या महिलांबाबतचा मुद्दा हाताळण्यात आला आहे. या लेखाचे शिर्षक “मला घाबरवता येणार नाही, मला विकत घेता येणार नाही’, असे आहे. या महिलांनी टाईमच्या प्रतिनिधींना सांगितले की सर्वोच्च न्यायलयाने त्यांना परत जाण्यास सांगितले आहे. मात्र आम्ही परत जाणार नाही. आम्ही आमची काळजी घ्यायला समर्थ आहोत. आम्ही केवळ शेतीत समान भागीदारच नाही तर घराचा आणि शेतीचा आधारही आहोत.

आम्ही परत का जावे? ही काही केवळ पुरूषांची निदर्शने नाहीत. आम्हीही पुरूषांच्या बरोबरीने शेतात घाम गाळतो. जर आम्ही शेतकरी नसू तर मग आमची ओळख काय? असा सवाल उत्तर प्रदेशमधील जसबीर कौर या 74 वर्षीय महिलेने विचारला, असे टाइमच्या लेखात म्हटले आहे.

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातून आलेल्या या महिला परत जायचे का? असे विचारता नाही असे ठामपणे सांगत असतात, असेही या लेखात म्हटले आहे. टिकरी सीमेवर कडेवर बाळ घेऊन घोषणा देणाऱ्या महिलेचे हे छायाचित्र आहे. तीन कृषी कायदे मागे घ्यावेत म्हणून शेतकऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे मात्र, त्याची दखल अद्याप केंद्र सरकारने घेतली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.