शोनन इंजिनिअरिंग यांचे काम रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी
नगर – केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत कामासाठी नेमलेल्या मे. शोनन इंजिनिअरींग वर्क्स प्रा.लि.,पुणे या संस्थेकडून या कामाच्या मुदतीत ते पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे या संस्थेला कामासाठी मुदतवाढ देवू नये अन्यथा अमृत योजनेची फेज – 2 सारखी वाट लागण्याची भीती आहे.
त्यामुळे या संस्थेचे काम रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी उपमहापौर सौ.मालनताई ढोणे यांनी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत महानगरपालिकेच्या कामासाठी मे. शोनन इंजिनिअरींग वर्क्स प्रा.लि.,पुणे या कंपनीची निविदा मंजुर होउन त्यांना दि.1नोव्हेंबर 2017 मध्ये महानगरपालिकेने कामाचा कार्यारंभ आदेश दिलेला आहे.
सदरील काम दोन वर्षात पुर्ण करण्याची अट असतांनाही हे काम आज अखेर पुर्ण केलेले नाही.या कामाची एकुण आर्थिक प्रगती -36 टक्के व एकुण भौतिक प्रगती -42 टक्के इतकी असल्याचे निदर्शनास येते. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांचे सुचनेनुसार दि.31 ऑक्टोबर 2019 पर्यंत काम पुर्ण करणे आवश्यक होते. सदरील संस्थेच्या सद्यस्थितीच्या कामाची परिस्थिती पहाता हे काम पुढील तीन ते चार वर्ष पुर्ण होणार नाही.
ही संस्था अकार्यक्षम असुन काम करण्यास सक्षम नाही. निविदा अटी व शर्तीचे भंग करणारे काम त्यांच्याकडुन होत आहे. शहर पाणीपुरवठा योजना फेज-2 चे व अमृत योजनेचे काम मार्गी लागत नसल्याने जनतेस पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही व नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अमृत योजनेचे काम रदद न केल्यास शहर पाणीपुरवठा योजना फेज-2 सारखेच हे काम रखडले जाईल व शासनाकडुन येणाऱ्या अनुदानाचा गैरवापर होउन या कामाचीही विल्हेवाट लागणार आहे.
या संस्थेला मुदतवाढ देणे महापालिकेच्या हिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही. यामुळे महापालिकेने अमृत योजनेचे काम रद्द करुन त्यांना काळया यादीत टाकणे तसेच नव्याने प्रसिध्द केलेल्या कामास अतिरिक्त खर्च आल्यास सदरचा खर्च मे. शोनन इंजिनिअरींग वर्क्स प्रा.लि.पुणे यांच्याकडील सुरक्षा रक्कम, जंगम मालमत्ता, बॅंकखाते इ.स्त्रोतांमधुन वसुल करण्यात यावेत.