पिंपरी (प्रतिनिधी) – करोनाच्या भीतीमुळे अनेकजण नातीगोती विसरून जात आहे. एकमेकांना मदत करणे तर दूरच पण अखेरच्या क्षणी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी येण्यास नकार देत आहेत. अशाच एका घटनेत वाकड पोलिसांना मृतदेहाची ओळख पटविण्याकरिता कायद्याचा धाक दाखवावा लागला. त्यानंतरच मृतदेह ओळखून त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुक्रवारी सायंकाळी चिंचवडजवळील पवना नदीपात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. अग्निशामक दलाने मृतदेह बाहेर काढल्यावर एका नागरिकांने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चिंचवड परिसरात महिलेची माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर केलेल्या तपासात धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली.
शोभा सुभाष टेके (वय 55, रा. राहुल भोईर यांची चाळ, चिंचवडगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिलेचा पती आणि आई यांचा पूर्वीच मृत्यू झालेला असून तिला मूलबाळही नाही. तिची एक नातेवाईक महिला तिच्या घरी येऊन राहत असे. मात्र शोभा या गेल्या काही दिवसांपासून आजारी पडल्या. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले. यामुळे घरमालकाने त्या महिला नातेवाईकाशी संपर्क साधून तिच्यावर उपचार करण्यास सांगितले. मात्र करोनाच्या भीतीमुळे एरव्ही घरी येऊन राहणाऱ्या त्या महिलेने स्पष्टपणे नकार दिला.
एवढेच नव्हे तर शोभा ही माझी कोणीच लागत नसल्याचे सांगितले. यावर घरमालकाने शोभा यांना तुमच्या घरी आणून सोडतो, असे सांगितले. यावर तिला आमच्या घरी आणले तर मी जीव देईन, अशी धमकी दिली. एकाकी पडलेल्या अणि मानसिक संतुलन बिघडलेल्या शोभा यांनी पवना नदीत उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी शोभा यांचे घर शोधून काढले.
तिच्या नातेवाईक महिलेचा संपर्कही केला. ओळख पटवून अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक आवश्यक होते. मात्र नातेवाईक महिलेने नकार दिला. अखेर पोलिसांनी कायद्याचा धाक दाखविला. त्यानंतर त्या महिलेने मृतदेह ओळखून वाकड पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.