पुणे – सर्व वाहनमालकांना “एनईटीसी फास्टॅग’ रिचार्जची सुविधा देण्याच्या हेतूने, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) आता भीम युपीआयद्वारेही रिचार्ज करण्याचा पर्याय उपलब्ध केला आहे. वाहनमालकांना आता कोणत्याही भीम यूपीआय एनेबल्ड मोबाइल ऍपवरून फास्टॅग रिचार्ज करता येईल आणि टोल प्लाझांवरील गर्दी टाळता येईल.
एनपीसीआयचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रविणा राय यांनी सांगितले, ग्राहकांना एनईटीसी फास्टॅगची सेवा देणे, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भीम यूपीआयद्वारे एनईटीसी फास्टॅग रिचार्जचा पर्याय उपलब्ध केल्याचे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना युपीआय एनेबल्ड मोबाइल ऍप्लिकेशन वापरून सुरळित, सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने टोल भरता येईल.
नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (एनईटीसी) हा भारतातील इलेक्ट्रॉनिक टोलिंगसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. याद्वारे सेटलमेंटसाठी क्लिअरिंग हाउस सेवा व लवाद व्यवस्थापन यासह टोल भरण्यासाठी देशभर इंटरऑपरेबल सुविधा दिली जाणार आहे.
ग्राहकांना आता भीम यूपीआय एनेबल्ड मोबाइल ऍप्लिकेशन्सद्वारे सुरळितपणे त्यांचे फास्टॅग खाते रिचार्ज करता येऊ शकते. त्यासाठी प्रथम भीम यूपीआय ऍपला लॉगिन करावे लागते. सेंड ऑप्शन निवडून एनईटीसी फास्टॅग यूपीआय आयडी द्यावा लागतो. व्हेरिफाय युवर यूपीआय आयडीवर क्लिक केल्यानंतर रिचार्जची रक्कम टाकावी लागते. व्यवहार ऑथेंटिकेट करण्यासाठी पीन टाकल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या फास्टॅग वॉलेटमध्ये पैसे जमा झाल्याचे सांगणारा एसएमएस येतो.
महामार्गांवर फास्टॅग बंधनकारक
15 डिसेंबर 2019 पासून सर्व राष्ट्रीय महामार्गांवर फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. फास्टॅग वापरण्यास सोपा, रिलोडेबल टॅग असून तो वाहनाच्या विंडस्क्रीनवर लावला जातो. या टॅगमुळे, वाहन टोलनाक्यावरून जात असताना या टॅगशी लिंक केलेल्या प्री-पेड किंवा बचत खात्यातून टोलची रक्कम आपोआप वजा केली जाते.