नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यांच्या उमेदवारीला काही विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर गोपालकृष्ण गांधी आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र आता फारुख अब्दुला यांनीही ही निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.
राष्ट्रपतीपदासाठी संभाव्य संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून मी माझे नाव मागे घेत आहे. मला विश्वास आहे की, जम्मू-काश्मीर एका वेगळ्या वळणावरून जात आहे. अशा अनिश्चित काळात राज्यातील जनतेला बोलता यावे यासाठी माझे प्रयत्न आवश्यक आहेत, असे फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गुलाम नबी आझाद या काश्मीरमधील अन्य एका नेत्याच्या नावाचीही चर्चा होती. मात्र त्यावर पुढे काही बातमी आलेली नाही. पण अब्दुल्ला यांनीही शरद पवार यांच्याप्रमाणे विरोधकांचा संयुक्त उमेदवार होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून अजून कोणत्याही उमेदवाराची घोषणा झालेली नाही.
याबाबत पक्षाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. देशाच्या नव्या राष्ट्रपतीबाबत देशवासियांमध्ये देखील उत्सूकता आहे. त्यामुळे मोदी कोणाचे नाव सूचवतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.