आळंदी (ज्ञानेश्वर फड) – माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।। पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधीले।। संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. मंगळवारी (दि, 21) सायंकाळी चार वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यातील व्यवस्थापन पूर्ण झाले आहे. तसेच दोन वर्षानंतर पायी पालखी सोहळा होत असल्याने यंदा प्रस्थान सोहळ्याला लाखों भाविकांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे भाविक, वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नगरपरिषद प्रशासनाचीही जोरदार तयारी सुरु आहे. तसेच माऊली देवस्थानचीही तयारी जवळपास पूर्णत्वास आली आहे.
माऊली पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक श्रीधर सरनाईक म्हणाले की, दोन महिन्यांपासून पालखी सोहळ्याच्या नियोजनाची तयारी सुरु आहे. आता काम पूर्णत्वास आले आहे. सोहळ्यासोबत असलेले शासकीय अधिकारी, मानकरी, सेवेकरी, गावातील प्रतिष्ठित मंडळी, प्रशासकीय व्यवस्थापन यांची प्रसादाच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येते. त्यादृष्टीने दररोज 500 लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात येते त्याची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व शिधा, सोहळ्यात लागणाऱ्या सर्व वस्तूंची तयारीही झालेली आहे. तीन ट्रक, तीन रिक्षा, गाड्या सोबत असणार आहेत. पहाटे पवमान अभिषेक व रात्री दुधारती होते त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचीही तयारी पूर्ण झालेली आहे, असे त्यांनी नमूद केले.
गेली दोन वर्षे वारी न झाल्याने यावर्षी 25 टक्के भाविक जास्त येण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आळंदी परिसर हा नो हॉकर्स झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातील व्यक्तींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी नमूद केले.
आजपासून वाहनांना प्रवेश बंदी
आळंदीत वारकऱ्यांची वाहने वगळता रविवार (दि. 19) ते (दि. 22) या काळात इतर वाहनांना प्रवेश बंदी असेल. इतर वाहनचालकांनी पुणे- नाशिक रस्ता, देहूफाटा ते मोशी रस्ता, चऱ्होली धानोरे बायपास, मरकळ-कोयाळी रस्ता, पुणे-नगर आदी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी नमूद केले.
संत तुकाराम महाराजांचे उद्या प्रस्थान
संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सोमवारी (दि. 20) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. पहाटे 5 वाजता श्रीची संत तुकाराम महाराज शीळा मंदिर, श्री विठ्ठल-रखुमाई महापुजा होईल. पहाटे 6 वाजता वैकुंठस्थान श्री तुकोबारायांची पुजा होईल. सकाळी 7 वाजता संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, वंशज, वारकरी यांच्या हस्ते तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा होईल. सकाळी 10 ते 12 या वेळेत रामदास महाराज मोरे देहूकर यांचे पालखी प्रस्थान सोहळा काल्याचे कीर्तन होईल. 9 ते 11 दरम्यान इनामदार वाडा येथे तुकोबारायांच्या पादुकांचे पूजन होईल. दुपारी अडीच वाजता पालखी प्रस्थान सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल. सायंकाळी 5 वाजता पालखीची प्रदक्षिणा होईल. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळा इनामदार वाडा येथे मुख्य आरती होऊन विसावेल. रात्री 9 वाजता कीर्तन व हरिजागर होईल. तर मंगळवारी (दि.21) तुकोबारायांची पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ होईल.