श्रीनगर – लोकसभेत कलम 370 रद्द करण्याचे आणि जम्मू काश्मिरची पुनर्रचना करण्याचे विधेयक मंगळवारी मांडण्यात आले. त्यावेळी विरोधी बाकांवरील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि द्रमुकचे नेते दयानिधी मारन यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना अमित शहा यांनी फारुक अब्दुल्ला यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. ते त्यांच्या घरातच आहेत आणि कुठेही जाण्यास मुक्त आहेत, असे त्यांनी सांगितले.
लोकसभेत या विषयावरील चर्चेत सहभाग घेताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी सभागृहात 462 क्रमांकाच्या जागेवर बसते. माझ्या शेजारी 461 क्रमांकावर फारुक अब्दुल्ला बसतात. ते जम्मू-काश्मीरमधून निवडून आले आहेत. पण त्यांची काय भूमिका आहे हे आज आपल्याला समजू शकत नाही. त्यांचे मत जाणून घेतल्याशिवाय ही चर्चा अपूर्ण आहे, असे मला वाटते.
दयानिधी मारन यांनी फारुक अब्दुल्ला यांना सरकारने अटक केली असल्याचा आरोप करत सभागृहाचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांनी सदस्यांच्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे असे वक्तव्य केले आहे.