मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार एकविरा देवीचे दर्शन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे हे एकवीरा देवीच्या दर्शनही घेणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा असेल. शिवनेरी हे शिवरायांचे जन्मस्थळ आहे. शिवरायांच्या जन्मस्थळावर उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याचे संकेत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी प्रचारादरम्यान सत्तास्थापनेनंतर शिवनेरीला जाणार असे म्हटले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे शिवनेरीला जाऊन आपला शब्द पूर्ण करण्याची शक्यता आहे. विधानसभा निकालानंतर सत्तास्थापनेच्या घडामोडीदरम्यान, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, शिवाय कुलदैवत एकवीरेचेही दर्शन घेईन, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक घोषणा करत आहेत. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी करणार याचीच उत्सुकता आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची रोड मॅप तयार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. संपूर्ण कर्जमाफीसाठी 35 हजार 800 कोटी रुपये लागण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्राच्या मदतीशिवाय कर्जमाफी देणे शक्य असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध खात्यांशी संबंधित आढावा घेतला होता. विमा कंपन्यांकडे 15 हजार कोटी थकीत आहेत. कर्जमाफीसाठी निधी उभारण्याचे अनेक पर्याय सरकारकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कर्जमाफीची घोषणा कधी करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.