नागपूर – यंदा मोसमी पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला. त्यामुळे कोरडवाहू कापसाचे उत्पादन घटले आहे. त्यात दसऱ्यापासून कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि राज्य पणन महासंघाने खरेदी केंद्र सुरू न केल्याने खासगी खरेदी सुरू झाली आहे.
बहुतांश ठिकाणी व्यापारी हमीभावापेक्षा कमी किमंतीमध्ये खरेदी करीत आहे. तर दुसरीकडे बाजारात हमीभावापेक्षाही जास्त भाव मिळत असल्याने सलग तिसऱ्या वर्षी कापुस पणन महासंघाकडून खरेदी होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
2019/20 मध्ये करोना असतानाही 93.92 लाख क्विंटल, 2020/21 मध्ये 37.23 लाख क्विंटल खरेदी झाली. 2021/22 व 2022/23 मध्ये हमीभावापेक्षा जास्त भाव असल्यामुळे पणन महासंघाकडून खरेदी झाली नाही. तर 2023/24 च्या हंगामातही शक्यता कमी आहे. विदर्भातील बाजार समित्यांमध्ये कापसाला सरासरी 6 हजार 500 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.
यंदा खरीप हंगामात केंद्र सरकारने लहान धाग्याच्या कापसाकरीता 7 हजार 20 रूपये व आखूड धागा 6,620 रूपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या सर्वत्र कापूस वेचणीची कामे सुरू आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. पण व्यापारी हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदी करीत आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
“सीसीआय’चा “सब एजंट’ म्हणून पणन महासंघ दरवर्षी कापूस खरेदी करते. पणन महासंघाकडून राज्यात 50 केंद्रावर कापूस खरेदी होत असते. जळगाव, नागपूर, वणी, यवतमाळ, अमरावती, अकोला, खामगाव, परभणी, नांदेड, परळी व छत्रपती संभाजीनगर या 11 झोनमध्ये 2 टप्प्यांत कापूस खरेदीची सुरुवात पणनकडून केली जाते. पण याही वर्षी खरेदीची शक्यता नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
देशात सीसीआयची 53 केंद्रे सुरु
देशात कापूस दरांवर दबाव वाढल्याने सध्या हरियाणा, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेशात सीसीआयने खरेदी सुरू केली आहे. 7020 रुपये प्रतिक्विंटल दर किंवा हमीभाव कापसाला तेथे दिला जात आहे. सध्या देशात सुमारे सीसीआयचे 53 खरेदी केंद्र सुरू आहेत. पश्चिम विदर्भात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमीच आहेत. दुसरीकडे कापूस प्रक्रिया उद्योग रखडतच सुरू आहे. जिनिंग-प्रेसिंग कारखानदार आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा स्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्यकता लक्षात घेता सरकारने खरेदी सुरू करण्याची मागणी होत आहे.