सोलापूर – दुष्काळाचा सामना करत असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केली. तुकाराम माने असे या शेतकऱ्याचे नाव असून तो मोहोळ तालुक्यातील येणकी गावाचा रहिवासी आहे.
तुकाराम माने याने आपल्या शेतीवर युनियन बॅंकेकडून 12 लाखांचे कर्ज काढले होते. हे कर्ज फेडून कर्जमाफीचा फायदा घेण्यासाठी त्यांनी खासगी सावकाराकडून 3 लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र बॅंकेने घराच्या कर्जाचे हफ्ते भरून घेतल्याने कर्जाची रक्कम जैथे थेच राहिली . शिवाय खासगी सावकाराचे कर्ज वाढले. ऊस जाळून गेल्यावर आणि त्यानंतर आता डाळिंबाची बाग जळण्याच्या मार्गावर होती. परिणामी शेतीतून उत्पन्न येत नसल्याने घेतलेले कर्ज कसे फेडायचे याची त्याला चिंता लागली होती. दुष्काळ आणि नापिकीमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून तुकाराम हा त्रस्त होता. शेतीतील उत्पन्न येत नसल्याने आणि बॅंकांनी तगादा लावल्यामुळे घेतलेले 12 लाखाचे कर्ज कसे फेडायचे याची त्याला चिंता लागली होती. अखेर मंगळवारी त्याने डाळिंबावर फवारण्यासाठी आणलेले विषारी कीटकनाशक प्राशन करून शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली .