कारगिल युद्धातील शहिद कॅप्ट विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारीत सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. या सिनेमाचे नाव “शेरशाह’ असे ठेवले गेले आहे. या सिनेमामध्ये विक्रम बत्रा यांचा रोल सिद्धार्थ मल्होत्रा करणार आहे. विक्रम बत्रा एक रिअल लाईफ हिरो होते, त्यामुळे त्यांचा रोल पडद्यावर साकारण्यासाठी अपण विशेष उत्साही असल्याचे सिद्धार्थने सांगितले. या सिनेमाच्या शुटिंगच्या सुरुवातीला सर्व कलाकारांसह विक्रम बत्रा यांचे जुळे बंधू विशाल बत्र हे देखील उपस्थित होते. पहिल्या सीनच्या शुटिंगचा क्लॅप अन्य कोणी सेलिब्रिटीने नव्हे तर लेफ्टनंट जनरल वाय.के.जोशी यांनी दिला. कारगिल युद्धाच्यावेळी ते लेफ्टनंट कर्नल होते. त्यांच्याकडे 13 जम्मू काश्मीर रायफल्स बटालियनच्या कमांडिंग ऑफिसर म्हणून जबाबदारी होती. विष्णू वर्धन यांच्या दिग्दर्शनाखाली होणाऱ्या या सिनेमामध्ये कियारा अडवाणी देखील असणार आहे. “उरी- द सर्जिकल स्ट्राईक’नंतर आता “शेरशाह’ हा आणखी एक युद्धपट त्यामुळे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हळू हळू या शौर्यगाथेच्या शुटिंगचे किस्से समोर यायला लागतील, तशी या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढणार आहे.